'नगरी बोली'
संतोष पद्माकर पवार
नगरी बोली- एक आवडती 'बेक्कार' बोली
आंब्याचा आमरस पाणी टाकून वाढवला रस
ठकीला ग नवरा माझ्या मिळाला गांजेकस
....
माळ्याच्या मळ्यामधी बाई चिचचा आकडा
काहून येईना अजून भांग टोपीचा वाकडा
....
माळ्याच्या मळ्यामधी बाई कवठीला कवठं नऊ
आधी केला गुरुभाऊ मग म्हणती गंधर्व लावू
.....
अशा लोक ओव्या ऐकायला अहमदनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातच गेले पाहिजे.
‘काय करू राह्य़ला?’, ‘काय बोलू राह्य़ला!’, ‘जेऊ राह्य़ला’, ‘खाऊ राह्य़ला’ असे बोल ऐकायला मिळाले की हमखास अहमदनगर जिल्ह्य़ातील व्यक्ती आसपास आहे असे समजावे. नगरी बोलीचं वेगळेपण हे असं आहे. ही बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही. नगर जिल्ह्य़ाच्या भौगोलिक ठेवणीमुळे हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. उत्तर बाजूने खानदेश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या तालुक्यांवर असल्याचे दिसते.
मराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक गं्रथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले. शेख महंमद, चाँद बोधले आदी सुफी संप्रदायींचे लेखनही याच भूभागातले. शिवकाळातला मोजका काळ वगळता मध्ययुगीन काळापासून निजामाच्याच राज्याचा हा महत्त्वपूर्ण भाग होता. ख्रिश्चनांची पहिली मंडळी अहमदनगरला सर्वात आधी येऊन धडकली आणि मिशन कम्पाऊंडमधील वेगळी मराठी इथेच कविवर्य ना. वा. टिळक, ख्रिस्तपदनिर्माते कृ. र. सांगळे यांनी पुण्यमय करून सोडली आहे.
Give my love to mery याचे
'मेरीला माझे प्रेम दे' असे खास इंग्रजी भाषांतर या ख्रिश्चन कंपाउंडमधीलच.याची नोंद मूळ नगरच्या प्रख्यात साहित्यिक उमाकांत ठोमरे, संपादक-वीणा मासिक (कालावधी १९२९ ते १९९९) यांच्या लेखनात सापडते.
सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे दिनमित्रमधील लेखन तसेच 'कुलकर्णी लीलामृत' , डढढाशास्त्री परांने हे लेखन तत्कालिन नगरी बोलीचा प्रत्यय देते.
‘नगरी’ हा शब्द अहमदनगर जिल्ह्य़ातल्या लोकांसाठी वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्य़ातल्या बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्य़ाला शेजार आहे आणि मोगलांच्या काळापासूनची मुस्लीम वस्ती. या सर्व मिश्रणातून ‘नगरी बोली’चं एक वेगळंच रसायन तयार झालं आहे. शब्दांवर दाब देत व हेल काढत बोलणं इथपासून मराठी-हिंदीची सरमिसळ इथपर्यंत या बोलीत अनेक गोष्टी मिसळून गेल्या आहेत.
त्यामुळे इथल्या भाषेला संमिश्र रूप प्राप्त झाले. स्वत:ची फार वैशिष्टय़पूर्ण बोली वगैरे असे काही येथे नसून खेडूत लोकांनी जपलेली भाषा, इथल्या मुख्य व्यावसायिक गवळी समाजाच्या भाषेत नगर बोलीचे अंश सापडू शकतात. दिवसेंदिवस सुशिक्षित बनत चाललेल्या वर्गाला इथली बोली सहजी उमगत नाही. नागर भाषा वेगळी ठरते. जिल्ह्य़ातील काही अल्पशिक्षित नेतृत्व फक्त या भाषेचा वापर करतात. त्यांना बऱ्याच गोष्टी ‘म्हाईती’ नसतात. आजूबाजूच्या माणसाला सहजच ‘भावडय़ा’ म्हणून पुकारण्याकडे कल असतो. नातेवाचक शब्दात बहिणीऐवजी ‘भयीन’ असते. आईला ‘बय’, ‘बई’ म्हणून संबोधतात. वडिलांना ‘दादा’ म्हटले जाते. आत्याला ‘मावळण’ हा आगळाच शब्द वापरला जातो.
‘क्काय राऽऽ व’, ‘अय भ्भोव’, ‘तर्र ऽऽ म ऽऽ ग’, ‘लयऽऽ भारी’, ‘त्या माह्य़चा’, ‘ब्वॉ ऽऽ कसं सांगावं?’ अशी बोलण्याची सुरुवात असते.
‘माझं, तुझं’ हे इथे ‘माव्हं, तुव्हं’ बनतं. कर्जत-जामखेड तालुक्यांत तेच ‘मपलं-तुपलं’ बनतं. ‘माह्य़ावलं, तुह्य़ावलं’ हे शब्दप्रयोग हटकून होत राहतात. बऱ्याच वेळा ‘र’ अक्षरावर अनावश्यक जोर देऊन बोलण्याची प्रथा कशी पडली कुणास ठाऊक. गोदावरी, मुळा, प्रवरा काठावर, सीनेच्या उगमापासून प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलण्यानं नगरची बोली आकाराला येते असे दिसते. इथे दुग्धोत्पादनाचा मूळ व्यवसाय आहे. त्यातही गवळी समाजाच्या सोबतीनं इतरही अनेक जण तो करतात. गाईच्या (गावडीच्या) आचळावर दाब देऊन दूध काढण्याची रीत बोलण्यातही अवतरली असावी. जनावरांनाही- म्हशीला ‘म्हसाड’, गाईला ‘गावडी’, शेळीला ‘शेरडी’, कुत्र्याला ‘कुत्ताडी’ असे न्यारेच प्रयोग इथे आहेत. ‘मी’ इथे ‘म्या’ बनतो, तर ‘मला’चा ‘माला’ होतो. ‘ड’च्या जागी ‘ढ’ होतो, ‘हा’च्या जागी ‘वा’ होतो. म्हणून ‘डोहात’चा ‘ढवात’ होतो. 'ठ' च्या जागी 'ड' आणि 'ढ' करण्याची प्रवृत्ती आहे, इथं-तिथं चे 'इठ-तिठ' तर काही भागात इढ-तिढ होते.
बालाघाट, गर्भगिरी डोंगराच्या रांगातून ये-जा करणाऱ्या कष्टक ऱ्यांचे जिणेदेखील तेवढेच कष्टदायक आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे पडणारे दुष्काळही तीव्र आहेत. तुलनेने उत्तर नगर जिल्हा समृद्ध आहे. कारण तिथे सिंचनसोयी झाल्या आहेत. त्यामुळे १९३० च्या आसपास पुणे जिल्ह्य़ातून शेती करण्यासाठी आलेल्या नवस्थलांतरित आणि बागायतदारांची नवी संस्कृती इथे रुजली. दक्षिण नगर जिल्हा हा तसा कोरडाच. तिथे खरी नगरी बोली नांदते असे म्हणावे लागेल. जामखेड हे मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार. तिथे आपुलकीला ‘आलुनकी’ म्हणायची रीत आहे. ‘काय चाललंय लेका’ऐवजी ‘काय चाललं, लका’ इथेच ऐकायला येते. लोक त्याकाळी समृद्ध बेलापूरला पोट भरण्यासाठी जात. आज कोणीही कोठेही पोट भरायला गेला तरी त्याला ‘बेलापूरला जाणं’ असंच म्हणतात.
पाथर्डी तालुक्यात उसतोड कामगारांची स्वतंत्र बोलीच असल्यासारखी परिस्थिती आहे. तांड्यावर बोलली जाणारी बंजारा बोली स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. उसतोड कामगार त्या मिश्रणाची नगरी बोली बोलतो.शब्दांचे महाप्राण उच्चार अल्पप्राण बनविण्याची पद्धती मजेशीर म्हणावी लागेल.जसे भाकर- बाहाकर,भगुनं- बहगुनं, धोतर-दोहोतर-दोहथर, घमेलं-गहमेलं, असे ते वेगळे उच्चार असतात.
त्यातच मढी या तीर्थस्थळी अखिल भारतीय भटक्या जमातींची जत्रा भरत असते. त्यात होणारे जात पंचायतचे न्यायनिवाडे गाजत असत आणि त्यातून अनेक शब्द नागर समाजाला माहीत होत असत. पळी- घरून पळून जाणारी, फलका- नपुंसक,पाकळीबंद---मार्ग बंद असलेली,असे कितीतरी शब्द टे संपूर्ण सांस्कृतिक अर्थासह समजून घेतले तर कळतील अशी स्वतंत्र त्यांची परिभाषा आहे. मढीच्या जत्रेत डील्ल, घेटलं, मागिटलं, असे शब्द ऐकले तरी वैदू किंवा तत्सम कोण बोलते आहे हे नेमकेपणाने ओळखता येते.
सहकारात अव्वल ठरलेल्या या जिल्ह्य़ाला ‘इर्जिकाची’ परंपरा जुनीच. आणि हा शब्द इथूनच इतरत्र गेला. शेतीची नवनवीन तंत्रं आली, पण मोट-नाडा होत्या त्याकाळची काही शब्दांची जागा त्या वस्तू जाऊनही या ना त्या कारणाने उच्चारात आहेत. मोट, नाडा, चऱ्हाट, कासरा, सौंदर, येसन, येठन, खुर्दर, हातनी, जू, शिवळा, धुरा असे शब्द नायलॉन रोप येऊनही आज इथं ऐकायला मिळतात.
आदिवासी-कोळी, ठाकर यांची स्वतंत्र बोली बोलणारे समूह कोकणकडय़ाच्या अकोले, संगमनेर व निकटच्या राहुरी तालुक्यात आढळतात. त्याविषयी गोविंद गारे आदी प्रभृतींनी मोठे काम केले आहे. मात्र, तेथील इतर समाजघटकांची भाषादेखील त्यामुळे बदलली आहे. दया पवारांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनात त्याचा नमुना सापडतो. तर कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या बोली-उच्चाराचा वेगळा अभ्यास केल्यास बराच उलगडा होईल. ‘खायलाच’ म्हणताना ‘य’ लोप पावून ‘खालाचं’, तसेच ‘जालाचं’, ‘प्यालाचं’ अशी रूपे इथे वापरात आहेत. राम नगरकर यांचा ‘रामनगरी’ हा एकपात्री प्रयोग संपूर्ण नगरी बोलीत आहे. त्यामुळे नगरची भाषा सर्वदूर गेली. 'मी तो हमाल' हे अप्पा कोरप्यांचे आत्मचरित्र नगरी बोलीचा उत्तम नमुना होय.
कालकथित दादासाहेब रूपवते यांचे फर्डे वक्तृत्व अकोल्यातल्या बोलीचे वैशिष्टय़ होते. ‘ताम्रपटकार’ रंगनाथ पठारे यांच्या काही कादंबऱ्यांत नगरच्या बोलीचे पडसाद उमटलेले आहेत. ‘गोधडी’ हे आत्मकथन लिहिणाऱ्या अण्णासाहेब देशमुखांच्या कादंबरीत या बोलीचे वळण आढळते. त्यातील करतानी, जातानी, खातानी, पितानी, येती, जाती, उठती, बसती, खाती, पिती, चालती, येयेल हे, जायेल हे, पाहेल हे- ही क्रियापदरूपेदेखील ऐकायला गोड वाटतात.
डाव्या चळवळीचे नेते शाहीर भास्करराव जाधव यांची गाणी नगरी बोलीचा आवर्जून पुरस्कार करत.
मधुकर तोडमल यांनी नाटकात साकारलेली काही पात्र आणि त्यांच्या लकबी खास नगरी होत्या.सदाशिव अमरापूरकर असेच नगरी हेल लाभलेले कलावंत, त्यांची मराठी, हिंदी ऐकणे हा एक अनुभवच झाला आहे.
अलीकडील एक गुणी अभिनेता मिलिंद शिंदे नगरी बोलीचा लहेजा चित्रपटात वापरतो.
कुमार सप्तर्षी यांनी लोकसत्ता दैनिकात लिहिलेल्या 'राम राम पाव्हनं' या सदरात या बोलीचा अत्यंत बुजुर्ग व्यक्तीकडून वापर झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने वाचले आहे.तर अहमदनगर आकाशावाणीवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'नगरी नगरी ' या किरण डहाळे यांच्या विनोदी निवेदनात साकारलेल्या साप्ताहिक कार्यक्रमात नगरी बोलीचा प्रत्यय सर्व श्रोत्यांना आला आहे. किरण डहाळे यांनी ही शैली विकसित करून नगरी बोलीचा आयकॉन ठरेल अशी एखादी एकपात्री , नाट्यकृती समोर आणल्यास तो एक चिरंतन ठेवा होईल. तूर्तास त्यांच्या आकाशवाणी रेकॉर्ड खूपच मोठा ठेवा आहेत.
सरसकट उसाची शेती करणाऱ्या आणि सहकारी कारखान्यांची (आता खासगी) भरभराट असलेल्या जिल्ह्य़ात शेतकरी शेतात करावयाचे 'आळे' जेवतानाही भातात करतो ,ज्यात कढी, आमटी घ्यायची असते.
‘वाफसा’ असेल तर पीक पेर करणे उत्तम समजले जाते. पण इथे भूक नसेल, जेवण जाणार नसेल तर ‘वाफसा नाही’ असे म्हणतात. सहकारी कारखान्यात ऊस गेटावर नेऊन मोजून देणे आणि तिथेच पैसे घेऊन मोकळे होणे याला ‘गेटकेन’ म्हणतात. तीच पद्धती विवाहात आली. आता विवाह ‘गेटकेन’ होतात. म्हणजे एकाच दिवशी पाहणी, बोलणी आणि लग्न असे तिन्ही कार्यक्रम उरकण्याला ‘गेटकेन/गेटकिन लग्न’ म्हणतात.शेतीसाठी सायफन म्हणून नदी-कालव्यातून मोठमोठय़ा पाईपलाइन करण्याची पद्धती इथे वाढली, त्या पाइपलाइनवर एअरव्हॉल्व्ह कायम ‘हुस'- 'हुस’ असा आवाज करतात. त्यावरून एअरव्हॉल्व्हला ‘हुसहुसा’ असा नवीनच शब्द या बोलीत अवतरला.
काही म्हणी फक्त इथेच सापडतात. त्या काहीशा शिवराळ स्वरूपाच्या, नगरी लोकांच्या प्रकृतिधर्माला धरून असाव्यात. ‘येळंला केळं न् वनवासाला सीताफळं,’, ‘उखळात घालायचं, मुसळात काढायचं’, ‘नवीन मुसलमान व्हायला न् रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली’ 'चव ना चोथा -- रे भुता' 'भूताकडून गीता' अशा काही म्हणी इथे आहेत. तसेच तिरळ्या माणसाला ‘कान्हेगाव-कोपरगाव’ किंवा ‘नगर-भिंगार’ असे म्हणण्याची आणि उगाच हेलपाटा पडला म्हणण्याला ‘पुण्याहून पुणतांबा केलं’ असं म्हणण्याची इथं रीत आहे. विशेष म्हणजे कोपरगाव, कान्हेगाव, पुणतांबा ही गावे शेजारीच आहेत. पण ती बोलीत अशी फिट्टं बसली आहेत. मराठीत त्याचा दूरवर वापर होतो.
नगरला पहिलवानांचे मोठे पेव आहे आणि त्यांच्या ठिकठिकाणी तालमी आहेत. त्यातूनही एक उर्मट भाषा जन्मली असावी असे दिसते. ‘जार नाही वाळला, पण उत किती?’, ‘व्हटावरचं दूध नाही निवलं अजून’, ‘आळापण घालाव लागंल, औषीद शोदाव लागंल’ अशी दादागिरीची, दमबाजीची भाषा इथे विपुल आहे. खास नगर तालुक्याच्या परिसरात ‘करडईला किडा नाही, वक्टय़ाला पिडा नाही’ ही म्हण ऐकायला मिळते. ‘पायखुटी’ हा शब्द बृहत् अर्थाने वापरतात. अगदी लग्न करून देण्यासाठीदेखील.
सोनईजवळ घोडेगावला जनावरांचा प्रसिद्ध बाजार भरतो. तेथील व्यवहारात अनेक गुप्त संकेताचे शब्द वापरले जातात. विटी,भुरका,केवळी, तळी असे काही ते शब्द आहेत. म्हशीच्या नराला 'हाल्या' (या नावाचे पात्र राम नगरकर विच्छा माझी पुरी करा या वगात करीत असत), टोणगा, अगदी निरुपयोगी म्हणून 'अंतुल्या'(कसा शब्द आला कुणास ठाऊक?) असे शब्द आहेत. म्हशीच्या मादी पिल्लाला 'वगार' म्हणतात. याच भागात इमामपूर घाटात घडलेला वगारीचा किस्सा खासगीत लोक रंगवून आजही सांगतात.(विस्तारभयास्तव येथे तो सांगत नाही)
भाकरीला ‘भाकऱ्या’ म्हणतात. त्या तयार करण्याला बनवणारीच्या मन:स्थितीप्रमाणे ‘भाक ऱ्या घडविणे’, ‘भाक ऱ्या थापणे,’ ‘भाकऱ्या छापणे’, ‘भाकऱ्या बडविणे’ असे विविध शब्दप्रयोग आहेत. भाजीला ‘कोरडय़ास’ म्हटले जाते. कर्जत भागात उडदाच्या आमटीस ‘शिपी आमटी’ म्हणून पुकारले जाते. सोबत लसून ठेचा, खर्डा, झिरकं (दाण्याची वाटून केलेली आमटी) असे खास नगरी प्रकार असतात. फळांमध्ये पेरूला जांब, चिक्कूला चक्कू असे सुलभ शब्द योजले जातात.
इथे विहीर पुरुषभर मापात नाही, तर ‘परसा’त मोजली जाते. मापाला बाजारात ‘मापटं’ म्हणतात, तर मोजणीची परिमाणं अजूनही खंडी, मण, शेर, आदशेर, आच्छेर, पावशेर, अदपाव, आतपाव, छटाक अशी उतरत्या क्रमाने आहेत.
प्रहराला ‘पारख’ ठरवले आहे. कालव्याचा पूल ‘तवंग’ असतो. सवड मिळणे यास ‘सावड’ असा भलताच शब्द येतो. ‘ठेचणे’ हे क्रियापद ‘चेचणे’ बनते. कुणीकडं म्हणताना ‘कुंकडं’ असे म्हटले जाते. ‘ओरडा’ शब्दास ‘आरोड’, ‘गवार’च्या शेंगेंस ‘गोराणीच्या शेंगा’ म्हटले जाते. ‘लई लामण लाऊ नको’सारखे वाक्प्रयोग येथेच समजले जाऊ शकतात. एखाद्या गोष्टीत जास्त आशय वाढू लागला की ‘लांबण’चे ‘लामण’ होते. ‘लामणदिवा’ इथूनच आला असावा.
'इथं तिथं' शब्दाचे इठ-तिठ, इढ-तिढ असे उच्चार आहेत. मात्र, या सगळ्यापेक्षा खुद्द अहमदनगर शहराची भाषादेखील वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल. कोणतीही चांगली गोष्ट वर्णन करायची तर इथे ‘बेक्कार’ असे म्हटले जाते. नगरच्या बाजारपेठेत एक वडापावचे दुकान दिल्लीगेटच्या कारंज्याजवळ ‘बेक्कार’ नावाचे आजही आहे. एखादी व्यक्ती आपले काय वाकडे करणार, यावरून ‘काय घंटय़ा करून घेणार’, ‘गडबडला’ यासाठी ‘भांबाळला’, ‘गडबड- गोंधळा’साठी ‘हुंबल’ असे मजेशीर शब्द आहेत.
नगरात पतंग उडविणे हा एक मोठा शौक इथे आहे, 'वो काप्यो ', उईल्लावे' 'वोयखल्लास ' असे शब्द जाता येता सहज कानी पडतात. गणपतीचे कारखाने नगरच्या नेप्ती रस्त्यावर आहेत, तिथे डोळे रेखाटण्याला "डोळे काढणे चालू' असे भयंकर मराठी वापरले जाते.
उन्हाळ्यात बाप्ये माणसं डोक्यावर जे वस्त्र घेतात त्यास उपरणे, पंचा, बागायतदार,गमछा टापरी अशी नावे व्यक्तीच्या सामाजिक वर्गवारीनुसार दिली जातात.
नव्या पॅगो रिक्षांना येथे तिच्या आवाजावरून ‘टमटम’, हालण्यावरून ‘डुगडुगी’, दिसण्यावरून ‘डुक्कर’ अशी नावे दिलेली आढळतात. महिंद्रा कंपनीच्या मॅजिक वाहनाला ‘हत्ती’ संबोधले जाते. जीपला ‘जीपडं’ म्हटलं जातं. तर मोटारसायकलीला आवाजावरून ‘फटफटी’ अशी रंजक नावे आहेत.
नगर जिल्ह्य़ात मध्ययुगीन काळातल्या छावण्यांमधून उर्दूचा जन्म झाला असा इतिहास आहे. त्याचा प्रभाव इथल्या भाषेवर आजही आढळतो. ‘घम ना पस्तावा’ (गम ना पछतावा) अशा म्हणीत तो आढळतो. पेस्तर (चालू साल), गुदस्ता (गुजिश्ता) असे काही शब्द उर्दू, फारसी शब्दांची आठवण देतात. इथे मुस्लीम वस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे आणि त्यांची दखनी हिंदी मोठी रंजक आहे. ‘परडे में शेरडय़ा ओरडय़ा’ (परसात शेळ्या ओरडल्या), ‘धावत्या धावत्या आया न् धपकन् आपटय़ा’ (धावत धावत आला नि धपकन् आपटला), इत्यादी.
या बोलीचा प्रत्यय वर नमूद केलेल्या साहित्यिकांच्या व्यतिरिक्त अशोक थोरे, टी.एन. परदेशी, देवदत्त हुसळे, आ.य.पवार, अशोक बनसोडे , दिनकर साळवे, प्रकाश घोडके, पुंडलिक गवंडी, वसंत मुरदारे, भाऊसाहेब सावंत, यशवंत पुलाटे, बाबासाहेब सौदागर, महेश देशपांडे, संजय बोरुडे आदींच्या निवडक साहित्यात नगरी बोलीचे दर्शन घडते. त्याचा बृहत शोध घेतल्यास अभ्यासकांना मोठे भांडार निश्चित खुले होईल. आणि ते आपल्यापुढील एक मोठे अभ्यास आव्हान मानण्यास हरकत नाही.
हेल आणि बोलावरून नगरी बोली वेगळी काढता येईल, परंतु ती आता नष्ट पावत चालली आहे. त्याला वाढते नागरीकरण हे एक कारण आहे.
संतोष पद्माकर
No comments:
Post a Comment